इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प "अटल' - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची भूमिका...
पिंपरी, दि.1 ( सह्याद्री बुलेटीन )- पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या उपसूचनेला महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या भूमिकेवर आम्ही "अटल' आहोत, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्ती केले.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान स्व अटलबिहारी वाजपेयी यांचे दि.16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. देशाच्या राजकारणातील "भारतरत्न' हरवल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्त होत होती. त्यावेळी देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात अटलींचे नाव अजरामर राहील, अशा भावना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. नगरसेवक नामदेव ढाके यांनी याबाबतची उपसूचना मांडली होती. त्याला नगरसेवक सुरेश भोईर यांनी अनुमोदन दिले. त्याद्वारे हा विषय मंजूर करण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केवळ चर्चेत होता. अखेर त्याला मूर्त रुप मिळाले असून नदी सुधार प्रकल्पासाठी पवना, इंद्रायणी नद्यांचा सर्वे झाला आहे. त्यात भराव टाकलेली ठिकाणे, पात्रालगतची गॅरेज, हॉटेल व बांधकामांची माहिती संकलित केली आहे. तर, थेट नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, नाल्यांची माहिती घेतली आहे. निळी व लाल पूररेषा विचारात घेऊन नद्यांचा विकास केला जाईल. त्यासाठी महसूल विभागाकडून नदी पात्राची माहिती, नकाशे मिळविण्यात आले आहेत. प्रकल्पात इंद्रायणी नदीचा पहिल्या टप्प्यात तळवडे ते चिखलीदरम्यान प्रस्तावित डीअर पार्कचा परिसर, तसेच आळंदी ते चऱ्होलीदरम्यानचा हरित पट्टा विकसित केला जाणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली आहे.